खामगावात धाडसी घरफोडी ; उद्योजकाच्या घरात चोरट्यांनी मोठा हात मारला!दागिन्यांसह तीन लाखांचा मुद्देमाल लंपास! घरासमोरील चारचाकी पळवण्याचाही होता प्लॅन..

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरात धाडसी घरफोडी झाल्याची खळबळजनक घटना घडली. स्थानिक उद्योजक शिवशंकर लगर यांच्या घरावर मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारून दागिन्यांसह तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. इतकेच नाही तर चोरट्यांनी घरासमोरील चारचाकी देखील पळवण्याचा प्रयत्न झाला.
प्राप्त माहितीनुसार , खामगाव - शेगाव रोडवरील व्यंकटेश सिटी परिसरात शिवशंकर लगर यांचे दुमजली घर आहे. लगर त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त पुणे येथे गेले होते. त्यांच्या घरी त्यांची सासू व सासरे होते. दरम्यान, याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी १३ जूनच्या मध्यरात्री घराच्या किचनचे ग्रील कापून घरात प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अंदाजे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. घरातील सोने - चांदी साहित्य लंपास केल्यानंतर चोरट्यांनी घरातील लगर यांच्या बलेनो कारची चाबी घेतली. दारासमोर उभी असलेली बलेनो कार घेऊन पसार झाले होते. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर खामगाव - नांदुरा रोडवरील लांजुळ फाट्याजवळ लगर यांची चोरी गेलेली बलेनो कार आढळली. यावेळी खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचणकर, पीएसआय निलेश लबडे ,पोहेकॉ गजानन बोरसे,नापोका रवींद्र कन्नर, सागर भगत,संतोष गायकवाड, चालक संजीव धंदरे, गजानन काळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. फिंगरप्रिंट व डॉग स्पॉट्स पथक घटनास्थळी दाखल झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांनीही आपल्या पथकांसह घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सुरू आहे.