बाबो! खामगाव तालुक्यातील कोतवालांच्या १८ जागांसाठी ६५२ अर्ज दाखल!उद्या पात्र, अपात्र उमेदवारांची यादी! कोतवाल बनायला चौथा वर्ग पासची अट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्यांनी देखील केले अर्ज...

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):खामगाव तालुक्यात कोतवालांच्या फक्त १८ रिक्त जागांसाठी चक्क ६५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे यामधील शैक्षणिक अट चौथी पास आहे. मात्र उच्च पदवी प्राप्त केलेले उमेदवारही कोतवाल परीक्षेच्या रिंगणात उतरल्याचे दिसत आहे.

खामगाव तहसील अंतर्गत कोतवालांच्या १८ रिक्त जागांकरिता पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खामगाव तालुक्यात २२ जागा रिक्त आहेत. यामधील १८ जागांसाठी पदभरती होणार आहे. २१ सप्टेंबर रोजी तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली होती. नंतर अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. ६ आक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत १८ जागांसाठी ६५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे कोतवाल या पदासाठी  फक्त इयत्ता चौथी  पासची अट होती. यासाठी पदवीधर, उच्च पदवीप्राप्त उमेदवारही रिंगणात असल्याचे दिसून आले आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी देखील कोतवाल पदासाठीचे अर्ज भरले आहेत.