खामगावात राडा! संभाजी भिंडेंची सभा संध्याकाळी ५ ला होती पण दुपारी ३ ला सुरू केली; आमदार आकाश फुंडकरांच्या वाहनातून संभाजी भिडे गनिमी काव्याने सभास्थळी पोहचले; सभास्थळी मिडीयाला प्रवेश नाही!
Jul 31, 2023, 16:37 IST
दलीत पँथरचे आंदोलन; संध्याकाळी माजी आमदार सानंदा आंदोलन करणार
खामगाव(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या विरोधात काँग्रेस तसेच महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात ठीकठिकाणी भिडे यांच्याविरोधात आंदोलने होत आहेत, काल बुलडाण्यात काँग्रेसने केलेल्या आंदोलनादरम्यान एसटी बस वर दगडफेक करण्यात आली होती. या पार्श्वभुमीवर आज,३१ जुलैला खामगावच्या चोपडेंच्या मळ्यात संभाजी भिडेंची सभा होत आहे. संध्याकाळी ५ वाजता सभेची वेळ निश्चीत करण्यात आली होती, मात्र दुपारी ३ वाजताच ही सभा सुरू करण्यात आली. आमदार आकाश फुंडकर यांनी संभाजी भिडेंना गनिमीकाव्याने सभास्थळी पोहचवले.
आज सकाळी सभांजी भिडे अकोल्यातून शेगावला पोहचले, तिथे संत गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. दिवसभर शेगावात विसावा घेतल्यावर ते संध्याकाळी ते सभेसाठी खामगावात पोहचणार होते, मात्र अनेक संघटनांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अचानक सभेची वेळ बदलण्यात आली, निश्चीत केलेल्या धारकऱ्यापर्यंत तसेच मॅसेज पोहचवण्यात आले.
संभाजी भिडे दुपारीच खामगावात पोहचले, सभास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना अडवण्यात येईल असे चित्र होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरवली होती. याचवेळी भिडे यांच्यासारखा वेश चढवून एकाला एका वाहणात बसवण्यात आले, त्या वाहनाच्या समोर पोलिसांचे वाहन होते. त्यामुळे त्याचं वाहनात संभाजी भिडे असतील असे साऱ्यांना वाटले..मात्र एका दुसऱ्या वाटेने आमदार आकाश फुंडकर यांच्या वाहनाने संभाजी भिडे गुपचूप सभास्थळी पोहचले, सध्या त्यांची सभा सुरू आहे.बाहेर विविध संघटनांनी आंदोलने केली, काळे झेंडे दाखवले पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.