Confirm! वाघोबाच!! खामगावमध्ये सर्च ऑपरेशन सुरू

खामगावच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिला खबरदारीचा इशारा
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगावच्या गाडगे बाबानगरातील महाकाल चौक परिसरात वाघाचा वावर आज, ४ डिसेंबर रोजी पहाटे सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर दिवसभर शहरात एकच खळबळ उडाली होती. वाघाचा शोध घेऊनही वनविभागाला वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले नव्हते. अखेर सायंकाळी पाचला मढी डीपी रोडवरील बुंदेले यांच्या शेतात एका झाडाखाली वाघ बसलेला असल्याचे दिसले. त्यानंतर वनविभागाला सूचना मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. शंभरावर पोलिसांचा बंदोबस्त देखील परिसरात तैनात करण्यात आला आहे.

दुपारपर्यंत वाघ आहे की बिबट्या याबद्दल वनविभागाकडून स्पष्टता करण्यात येत नव्हती. मात्र संध्याकाळी वाघच असल्याचे स्पष्ट होताच त्‍याची शोधमोहीम सुरू करण्यात आली. बुलडाणा येथील रेस्क्यू टीम खामगावात पोहोचली आहे. परिसरात नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. मढी, सुटाळपुरा, सिंधी कॉलनी, सिव्हिल लाईन, महाकाल चौक, डीपी रोड, फरशी ते लायन्स ज्ञानपीठ भागात राहणाऱ्या नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. शेवटचे वृत्त रात्री सव्वा नऊला हाती आले तेव्हा वाघाची शोधमोहीम सुरू होती. अंधार, नाला व शेताचा परिसर असल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत.