जिल्हावासियांनी केलेली मदत बुलडाणा लाइव्ह ने केली पुरग्रस्त बांधवांना सुपूर्द! एका मॅसेज वर उभी राहिली मदत; मदत स्विकारणाऱ्या बांधवांची ओळख पटेल असे फोटो व्हायरल न करण्याचे बुलडाणा लाइव्ह चे आवाहन..

 
people
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मदत म्हणजे उपकार नाही, ते आपले कर्तव्य आहे.. महापुराने अनेक कुटुंबाची वाताहत झाली, शेकडो संसार उघड्यावर आले..अतिशय कष्टातून उभारलेले संसार सावरण्यासाठी आता मदतीची गरज आहे..बुलडाणा लाइव्ह ने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर मदतीसाठी हजारो हात सरसावले, जिल्हाभरातून अन्नधान्य, किराणा, शैक्षणिक साहित्य, कपडे याची मदत उभी राहिली. बुलडाणा लाइव्ह टीम ने ती मदत पूरग्रस्त भागातील गरजू बांधवांपर्यंत पोहचवली आहे. मदत सुपूर्द केल्याची बातमी प्रसिद्ध करावी की न करावी अशा संभ्रमात टीम बुलडाणा लाइव्ह होती, मात्र या कार्यासाठी हजारो लोकांनी मदत केली, आपली मदत गरजुंपर्यंत पोहचल्याचे समाधान मदत करणाऱ्या बांधवांना मिळावे तेवढ्यासाठी ही बातमी प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 

जळगाव जामोद ,शेगाव तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन बुलडाणा लाइव्ह ने केले, एका साध्या मॅसेज वर मदतीसाठी हजारो हात सरसावले. लोणार, मेहकर, जानेफळ, मलकापूर, पांग्रा, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, अंचरवाडी, देऊळगाव घुबे, कोनड खु, काळोना, मलगी, चिखली, बुलडाणा, मोताळा, खामगाव, शेगाव यासह इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गहू, तांदूळ, डाळ, तेल इतर किराणा साहित्य, शैक्षणिक साहित्य, कपडे याची मदत उभी राहिली. विशेष म्हणजे सगळ साहित्य नागरिकांनी निश्चित केलेल्या ठिकाणी आणून दिलं. "बुलडाणा लाइव्ह" च्या त्या त्या ठिकाणच्या प्रतिनिधींनी रात्र रात्र जागून साहित्याच्या किट तयार केल्या.  ४०७ वाहनांने जिल्हाभरात जिल्हावासियांकडून संकलित करण्यात आलेल्या मदतीची पहिली खेप २८ व २९ जुलैला जळगाव जामोद शहरातील पुरग्रस्त असलेल्या चौबारा, न्हावीपुरा भागात व जस्तगाव, काथरगाव या गावांत वितरण करण्यात  आली .गेल्या ६ दिवसांपासून मदतीपासून वंचित असलेल्या गरजू लोकांना मदत मिळाली.. ज्या कुटुंबांना स्वयंपाक करण्याची व्यवस्था नाही, गॅस सिलेंडर, भांडे  सगळ काही वाहून गेलय अशा ५० कुटुंबातील जवळपास २०० जणांची  पुढील ८ दिवसांची जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. मदतीची दुसरी खेप पुढील २ दिवसांत रवाना होणार आहे. ही जिल्हावासियानी जिल्हावासियांसाठी केलेली मदत होती. बुलडाणा लाइव्ह ने केवळ तिथल्या गरजुपर्यंत ती पोहचवण्याचे काम केले..

फोटो व्हायरल करू नका...

मदत स्वीकारणाऱ्या बांधवांचे फोटो समाजासमोर आणणे बुलडाणा लाइव्ह  ला योग्य वाटत नाही, मदत म्हणजे उपकार नाही तर ते आपले कर्तव्य आहे..त्या बांधवांवर जी वेळ आली ती कुणावरही येऊ नये, मजुरी करून, अतिशय कष्टाने उभारलेल्या संसाराची वाताहत झाली आहे. परिस्थितीने त्या बांधवांना मदत स्वीकारण्यास मजबूर केले आहे, त्यामुळे आपल्या या बांधवांचा स्वाभिमान दुखावणार नाही याची काळजी घेणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे मदत कार्य राबवणाऱ्या सर्वच संस्थांना, राजकीय नेत्यांना बुलडाणा लाइव्ह आवाहन करते की, कृपया मदत स्वीकारणाऱ्या बांधवांचे फोटो काढताना त्यांची ओळख स्पष्ट होणार नाही याची काळजी घ्यावी..