भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी जाहीर! राजा कायम मात्र तणावात राहणार; अवकाळी मुळे नुकसान होणार; रोगराई आणि पिंकावर संकट असल्याचीही भविष्यवाणी

 
yg
जळगाव जामोद(ज्ञानेश्वर ताकोते पाटील:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध अशी घटमांडणीवर आधारित भविष्यवाणी आज,२३ एप्रिलच्या सकाळी जाहीर करण्यात आली.  ३५० वर्षांपूर्वी या भागातील तपस्वी चंद्रभान महाराज यांनी ही प्रथा सुरू केली होती. त्यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी ही भविष्यवाणी जाहीर केली. पुढील वर्षभरात काय काय होईल याचे भाकीत यात वर्तविण्यात आले. राजा कायम राहील मात्र राजा तणावात राहील असे भाकीत आज वर्तविण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात पाऊस कमी, दुसऱ्या महिन्यात साधारण, तिसऱ्या महिन्यात जास्त आणि चौथ्या महिन्यात कमी पाऊस राहील असेही भाकीत वर्तविण्यात आले.यंदाच्या वर्षात अवकाळी पाऊस जास्त पडेल. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. रोगराई वाढेल आणि पिकांवर देखील संकट येईल असेही जाहीर करण्यात आलेल्या भाकीतात म्हटले आहे.


अशी होते घटमांडणी..!

गावाबाहेरील शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट, घटात पाणी आणि त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध १८ प्रकारची  धान्य, अशा या 'घट मांडणी'तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था आणि राजकीय घडामोडींचा अंदाज वर्तवला जातो. या प्रथेला शेतकऱ्यांची मोठी मान्यता असते आणि या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.राज्यातील शेतकऱ्यांचा या प्रथेवर मोठा विश्वास आहे. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी भेंडवळ ही घटमांडणी केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी  सूर्योदयानंतर याची भविष्यवाणी जाहीर केल्या जाते.