जिल्ह्याला अवकाळीने झोडपले; भिंतीखाली दोन चिमुकल्या बहिणी दबल्या, एकीचा मृत्यू; वीज पडल्याने शेतकरी ठार; पळशीत विज कोसळून सात मेंढ्या मृत्युमुखी

 

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जिल्ह्याला ७ एप्रिल रोजी अवकाळी पावसाने झोडपले. बहुतांश ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला. खामगाव तालुक्यात चितोडा येथे वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर पळशी खुर्द येथेही विजेने सात बकऱ्यांचा बळी घेतला. त्याचप्रमाणे संग्रामपूर तालुक्यात काटेल येथे घराची भिंत कोसळून त्याखाली दबल्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिची बहीण किरकोळ जखमी झाली. बुलढाणा शहर व परिसराला वादळी पावसासह गारपिटीचा फटका बसला. जिल्हाभर शेतकऱ्यांनाआस्मानी संकटाला सामोरे जावे लागले. कांदाबीज, भाजीपाला, आंबा, पपई, संत्रा पिकांची नासाडी झाली.

विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हा अंदाज खरा ठरवत अवकाळीने जिल्ह्यात धडक मारली. खामगाव तालुक्यातील चितोडा येथील शेतकरी गोपाल महादेव कवळे (४०) हे अंबिकापूर शिवारातील शेतात काम करत होते. सायंकाळी पाच वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. दरम्यान, अंगावर वीज कोसळून गोपाल कवळे यांचा जागीच मृत्यूझाला. वीज पडण्याची दुसरी घटना खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथे ७ एप्रिल रोजी दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली. भिकाजी उखड़ लोखंडे यांच्या शेतात चरणाऱ्या सात बकऱ्या वीज कोसळल्याने मृत्युमुखी पडल्या. विजय गव्हाळे यांच्या मालकीच्या दोन बकऱ्या, श्रीकृष्ण इंगळे यांच्या चार आणि रवींद्र आढाव यांची एक बकरी ठार झाली आहे.
  संग्रामपूर तालुक्यातील काटोल येथे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळली. भिंतीखाली २ चिमुकल्या बहिणी दबल्या.यात अडीच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला तर दुसरी बचावली असून जखमी झाली. कृष्णाली बोरवार असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव असून तिची बहिण राधा बोरवार जखमी झाली आहे.