संग्रामपूरमध्ये नाना पटोलेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
Jan 19, 2022, 10:36 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वादंग निर्माण झाले आहे. पटोलेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ संग्रामपूर तालुका भाजपतर्फे तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांच्या नेतृत्वात वरवट बकाल येथे निदर्शने करण्यात आली. भाजपाने आक्रमक भूमिका घेत पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला; मात्र तामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुतळा ताब्यात घेतला.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तामगाव पोलीस ठाण्यात पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आले. लोकेश राठी यांच्या नेतृत्वाखाली तामगाव पोलीस ठाण्यात नाना पटोलेंविरुद्ध तक्रार देऊन कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी पांडुरंग हागे, गजानन दाणे, सुभाष हागे, श्याम आकोटकर, डॉ. अमोल कुकडे, ज्ञानदेव भारसाकळे, अंबादास चव्हाण, अविनाश धर्माळ, सुनील दातार, वासुदेव सवडतकर, प्रकाश अरबट, निरंजन इंगळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.