संतापजनक... रोडरोमिओच्या सततच्या राड्यांमुळे १९ वर्षीय तरुणी वैतागली!
या प्रकरणी १९ वर्षीय तरुणीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यावरून शुभम सुनिल सपकाळ (रा. दालफैल, खामगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी जीएस कॉलेजला बीएस्सीचे शिक्षण घेते. ही तरुणी नॅशनल शाळेत शिकतानाही शुभम तिचा पाठलाग करून बोलायचा प्रयत्न करत होता. तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा त्रास वाढत गेल्याने तिच्या आईने तिला भोपाळला आपल्या माहेरी शिकायला पाठवले होते. तेथेही शुभमने त्रास दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तरुणी आता खामगावमध्ये घरी परतल्यानंतर शुभमचा त्रास पुन्हा वाढला आहे. तरुणीला काॅलेजमध्ये जाता-येता तो पाठलाग करतो.
बोलण्याचा प्रयत्न करतो, शिट्या मारतो, जोरजोराने आवाज काढतो. सध्या तो रोज समोरून बुलेटवरून चकरा मारतो. जोरजोराने हाॅर्न वाजवून घराकडे पाहत राहतो. काल सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास तरुणी, तिची बहीण आणि आई घरी असताना शुभम थेट घरात घुसला. तुम्ही माझ्यावरील केस परत घ्या. नाही एकेकाला मारून टाकेन, अशी धमकी देऊ लागला. मला तुझ्याशी बोलायचे आहे... असे म्हणून त्याने तरुणीचा वाईट उद्देशाने डावा हात पकडला व ओढू लागला.
तिची आई तिला सोडवायला धावली. या ओढाताणीत तरुणीचा टी-शर्ट फाटला. तिच्या आईने शुभमला घराच्या बाहेर ढकलून दिले व चॅनल गेट आतून बंद केले. शुभम बाहेरून शिविगाळ करू लागला. तुम्ही माझ्यावरील केस मागे घेतली नाही तर तुम्हाला सुखाने जगू देणार नाही नाही. मारून टाकेन, अशी धमकी देत निघून गेला. तिच्या आईने तरुणीसह शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शुभमविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोहेकाँ अनिल भगत यांनी तक्रार दाखल करून घेतली. तपास पोहेकाँ गजानन चोपडे करत आहेत.