चिखली नंतर आता खामगाव तालुक्यात आगलाव्यांचा उपद्रव! दोन एकरातील सोयाबीनची सुडी पेटविली..!
Oct 28, 2023, 12:25 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील शहापूर येथे रात्री अज्ञात आगलाव्याने दोन एकरातील सोयाबीनच्या सुडीला आग लावून दिल्याने दोन एकरातील सोयाबीन जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
संतोष रत्नाकर तिडके (रा.शहापूर ता.खामगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तिडके यांनी त्यांच्या दोन एकरातील सोयाबिनची सुडी त्यांच्या शेतात लावली होती. २७ आक्टोबर रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान कोण्यातरी अज्ञात आगलाव्याने सुडीला आग लावली. यात दोन एकरातील सोयाबीन जळून खाक झाले आहे.
या आधीही चिखली तालुक्यातील मेरा बु,येथील बाबुराव अनपट यांचे अडीच एकरातील, रामनगर येथील देवकाबाई रामदास भगत यांचे दोन एकरातील सोयाबीन आगलाव्याने पेटवून दिले होते.