शेजाऱ्यांमध्ये वाद होवून केली मारहाण ! म्हणाले, 'परत जर नांदाला लागले, तर जीवाने मारू!' तिघांविरुद्ध गुन्हा.. खामगावची घटना
Jun 25, 2024, 10:53 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) संकटकाळी सर्वात आधी धावून येतो तो शेजारी. शेजाऱ्यांमध्ये रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक सख्य असल्याचे दिसून येते. परंतु, किरकोळ कारणावरून वाद होवून मारहाण होणे. अशा घटनांमुळे अनेकदा शेजारधर्म तुटतो. तशीच एक घटना खामगाव शहरातून समोर आली आहे. घरासमोर पूजेचे साहित्य टाकले या कारणावरून वाद होवून मारहाण केल्याची घटना २२ जून रोजी घडली. प्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रंजना तायडे(रा.बाळापूर फैल) यांनी पोलिसांत तक्रार दिली, ६ जून रोजी घरी हजर असताना परिसरातील रहिवासी देवानंद शेगोकार हा सकाळी ६ वाजता घरासमोर आला. पूजेचे साहित्य असलेली थैली त्याने घरासमोर टाकली. ' तू आमच्या घरासमोर ही थैली का टाकली? असे म्हटले असता त्याने शिवीगाळ केली. त्यांनतर रंजना तायडे यांचे पती बाहेर आले. त्यांनी शिवीगाळ का करतो असे देवानंद याला विचारले. त्यांनतर देवानंद याने त्यांना शिवीगाळ केली, इतकेच नाही तर डोक्यात पाईप टाकून रंजना तायडे यांच्या पतीला जखमी केले. त्यांनतर तायडे व त्यांची मुलगी, नणंद ह्या त्यांना सोडवण्यासाठी गेले असता माया शिरसाट आणि आरती शेगोकार यांनी चाप्टा बुक्क्यांनी मारहाण केली. डोक्याच्या केसांची ओढतान केली आणि 'परत जर आमच्या नांदाला लागले तर जीवाने मारून टाकु' अशी सुध्दा धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी देवानंद शेगोकार, माया शिरसाठ, आरती शेगोकार अश्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.