कीर्तनकार बाळू महाराज गिरगावकरांविरुद्ध पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल! भाट समाजाला म्हणाले होते, बुट चाटणारे! नांदुरा तालुक्यातील बरफगांव मध्ये कीर्तनात केले होते वादग्रस्त विधान
Sun, 26 Mar 2023

खामगाव(विनोद भोकरे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): किर्तनकार बाळू महाराज गिरगावकर यांच्याविरुद्ध भाट समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदुरा तालुक्यातील बरफगांव येथे श्री दत्तूजी महाराज पुण्यतिथी सोहळ्यात २१ मार्चला बाळू महाराजांनी कीर्तन करतांना भाट समाजाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. ती क्लिप व्हायरल झाल्यावर जिल्हाभरातून निषेध व्यक्त करण्यात येत होता. ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यात बाळू महाराजांच्या विरोधात तक्रारी देण्यात आल्या होत्या. अखेर पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात बाळू महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाट म्हणजे राजदरबारी बुट चाटणारे लोक, भाटांना अक्कल नसते, भाट काही कामाचे नसतात यासह अनेक आक्षेपार्ह विधाने बाळू महाराज यांनी कीर्तनात केली होती. विशेष म्हणजे आयोजन समितीचा हेतू व बाळू महाराजांच्या कीर्तनाचा विषय भाट समाजाशी संबधित नसतांना सुद्धा त्यांनी उगाचच भाट समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. नांदुरा येथील राहुल मनोहर चोपडे यांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बाळू महाराजाविरुद्ध भादवी च्या कलम ५०५(१)(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.