तुम्ही लै पाह्यले असतीन वाढदिवस, पण असा नसंन पाह्यला..! म्हणूनच तर होतेय खामगावच्या या अनोख्या वाढदिवसाची चर्चा!!

 
खामगाव (भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बातमीचे हेंडीग वाचून तुम्ही बुचकळ्यात पडले असान..  त्याला कारणही तसच आहे म्हणा..लहान मुलांचे, मोठ्यांचे अगदी म्हाताऱ्या आजी आजोबांचे  जन्मदिवस तर हल्ली अलीकडच्या काळात साजरे होणारे लग्नाचे वाढदिवस तुम्ही पाहिले असतील..पण कधी मांजरीच्या वाढदिवसाबद्दल ऐकलय का? नाही  ना..म्हणूनच तर खामगावात मोठ्या थाटामाटात साजरा झालेला एका मांजरीचा वाढदिवस चर्चेचा विषय ठरत आहे..

 तर गोष्ट अशी आहे की, खामगाव तालुक्यातील मूळचे बोथाकाजी येथील हिवराळे दाम्पत्य सध्या खामगावात वास्तव्याला आहे. वर्षभरापूर्वी या हिवराळे दाम्पत्याला एका मांजराचे पिल्लू कुपोषित व जखमी अवस्थेत सापडले. जखमी असल्याने त्यावेळी त्याच्या अंगावरील केस गळत होते. नानाभाऊ हिवराळे यांनी त्या मांजराला घरी आणलं.. काही दिवस त्या पिल्लावर उपचार केले.."जीव लावला की जंगलच पाखरूही जवळ येत" अशी ग्रामीण बोलीभाषेतील एक म्हण आहे त्याचप्रमाणे हिवराळे दाम्पत्याने त्या मांजराला एवढा लळा लावला की ते मांजर आता त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य झालंय.

विशेष म्हणजे त्या मांजराचा नामकरण सोहळा हिवराळे दांपत्याने केला आणि त्याला 'गोपाल " असं नाव दिलं. काल, ६ मे रोजी हिवराळे दांपत्याने मोठ्या थाटामाटात औक्षण करून आणि केक कापून त्या मांजराचा पहिला वाढदिवस साजरा केला. या आगळ्या वाढदिवसाला उपस्थिती लावलेले परिसरवासी हिवराळे यांच्या  प्राण्यांवर असलेल्या प्रेमाने भारावून गेले..विशेष म्हणजे अनेकांनी स्टेटस ठेवून मांजराला ( गोपालला) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..त्यामुळे या अनोख्या वाढदिवसाची चर्चा तर होणारच ना भाऊ...