गोदामाला आग लागून दोन शेतकऱ्यांचे १२ लाखांचे धान्य खाक!; संग्रामपूर तालुक्यातील घटना

 
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गोडावूनला आग लागल्याने कापूस, तूर, मका, सोयाबीन, हरबरा असे धान्य आगीत भस्मसात झाले. यात दोन शेतकऱ्यांचे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. आज, १२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता संग्रामपूर तालुक्यातील बोडखा- कमळखेड रस्त्यावर ही घटना घडली.

बोडखा- कमळखेड रस्त्यावर पुरुषोत्तम रामदास हागे व कैलास रामदास हागे या दोन भावांचे गोडावून आहे. गावाशेजारी असलेल्या गोडावूनमधून अचानक धूर निघत असल्याने गावकऱ्यांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. नागरिक, महसूलचे कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनी दोन तासांनी आग आटोक्यात आली.

आगीत १० क्विंटल तूर, १० क्विंटल सोयाबीन, ६ क्विंटल कापूस, २ क्विंटल ज्वारी, २ क्विंटल गहू, ५ क्विंटल हरभरा, स्प्रिंकलर सेट, ५ ताडपत्री, ७५ टिनपत्रे, ठिबक सिंचन, बैलगाडी, कुटार, शेतीउपयोगी साहित्य असे एकूण १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. आमदार संजय कुटे यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्याला धीर दिला.