हजारो नागरिकांना गंडविणारा विजय गव्हाड दिड वर्षानंतर पोलिसांना शरण! महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून लावला होता चुना
विजय गव्हाडने दोन वर्षांपूर्वी युवा शक्ती जागरण मंच या संस्थेची स्थापना केली.आधी संस्थेच्या माध्यमातून त्याने धार्मिक कार्यक्रम घेतले. दरम्यानच्या काळात त्याने विधानसभेच्या मलकापूर मतदारसंघातून निवडणूक सुद्धा लढवली होती. परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना नागरिकांना कमी किमतीत महागड्या वस्तू देण्याचे आमिष दाखविले. यासाठी त्याने गावागावातील बचत गटांच्या महिलांना पैसे गोळा करण्याचे सांगितले. लोकांचा विश्वास वाढवा म्हणून काही गावांत त्याने महागड्या वस्तू दिल्याही,मात्र नंतर पैसे जमा करून तो पसार झाला.
त्याच्याविरुद्ध नांदुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता .मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याच्याविरुद्ध कारवाई व्हावी या मागणीसाठी फसवणूक झालेल्यांनी व बचत गटांच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुद्धा केले होते. अटकपूर्व जामिनासाठी त्याने केलेला अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर तो नांदुरा पोलिसांसमोर हजर झाला. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.