नापिकीचा बळी! तरुण शेतकरी पुत्राने घेतला गळफास; खामगाव तालुक्यातील घटना

 
7546
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सततची नपिकी आणि कर्जबाजारपणाला कंटाळून २७ वर्षीय तरुण शेतकरी पुत्राने गळ्याभोवती फास आवळत आत्महत्या केली.  ही धक्कादायक घटना आज, १९ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास खामगाव तालुक्यातील कोरेगाव बु येथे उघडकीस आली. अमोल रमेश काळे ( रा .कोरेगाव बु) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

 काल, १८ एप्रिल रोजी अमोल शेतात राखण करण्यासाठी गेला होता. सकाळी नेहमीप्रमाणे तो लवकर घरी आला नाही. सकाळी त्याचे वडील शेतात गेले असता अमोलने  शेतातील वडाच्या झाडाला गळफास घेतल्याचे त्यांना दिसल्याने त्यांनी एकच हंबरडा फोडला.  घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.

अमोलच्या वडिलांच्या नावावर बँक आणि होम फायनान्सचे कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड होत नसल्याने तणावात येवून अमोलने आत्महत्या केल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. अमोलच्या पश्यात पत्नी ,दोन लहान मुली, आई वडील आणि दोन लहान भाऊ असा परिवार आहे. तपास खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदा वाघमारे करीत आहेत.