Valentine's Day Week Special : जोडीदाराच्या शोधात मध्यप्रदेशातून वाघिण आली संग्रामपूर तालुक्यात!
Updated: Feb 9, 2022, 17:19 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात मध्यप्रदेशच्या बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील कॉलर आयडी असलेली वाघीण जोडीदाराच्या शोधात आल्याचे समोर आले आहे. २ फेब्रुवारीच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये ती कैद झाली. यामुळे अंबाबरवा अभयारण्याच्या व्याघ्र वैभवात भर पडली आहे. आता या अभयारण्यात ५ पट्टेदार वाघीण, एक वाघ व दोन वर्षांच्या आतील १० बछडे झाले आहेत.
बांधवगडहून आलेली वाघीण ४ वर्षांची आहे. दीड महिन्यापासून बांधवगड राष्ट्रीय उद्यानातून ती गायब होती. अंबाबरवा अभयारण्यातील पळसकुंडी वर्तुळातील अन्यार बीटमधील कॅमेरामध्ये ३१ जानेवारीला ती टिपली गेली होती. गस्त घालताना कॅमेराचे फूटेज तपासले असता सोनाळा वन्यजीव परिक्षेत्राचे आरएफओ सुनिल वाकोडे यांना ही २ फेब्रुवारीला तिचे चित्रिकरण दिसले. वरिष्ठ पातळीवर ही माहिती कळविण्यात आली आहे. सुमारे २५० कि.मी.चा टप्पा पार करून वाघीण येथे आल्याचे दिसून येते.