उठसूठ अकोला रेफर... भाजयुमोची टीम धडकली खामगाव सामान्य रुग्णालयात!; डॉ. टापरेंनी दिले ऑडिटचे आदेश

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव सामान्य रुग्णालयात सुविधा उपलब्ध असतानाही प्रसुती विभागात आलेले रुग्ण उठसूठ अकोल्याला रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घडणारा हा गंभीर प्रकार भारतीय जनता युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलेश टापरे यांच्या कानावर घातला आणि चौकशीची मागणी केली. त्‍यावर डॉ. टापरेंनी या रेफरचे ऑडिट करण्याचे निर्णय घेतला असून, तसे रिपोर्ट सादर करण्याचे आदेशही दिले.

खामगावच्या सामान्य रुग्णालयात उत्तम आरोग्य सुविधा आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रसुती विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांची हेळसांड केली जात असल्याच्या तक्रारी आमदार डॉ. आकाश फुंडकरांकडे आल्या होत्या. आज भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड. फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोचे पदाधिकारी सामान्य रुग्णालयात दाखल झाले. त्‍यांनी डॉ. टापरे यांना निवेदन देऊन चर्चा केली. या विभागातील काही वैद्यकीय अधिकारी रुग्णांना थेट न तपासता फोनवरूनच परिचरिकांना उपचाराबाबत सांगतात. येथे सुविधा उपलब्ध असतानाही अनेकांना अकोला रेफर करतात. यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

त्‍यावर प्रसुती रुग्ण अकोला रेफर केल्याबद्दलचा ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आदेश डॉ. टापरेंनी संबंधितांना दिले. प्रसुती रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र सर्वांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्‍न करत असल्याचेही डॉक्‍टरांनी या वेळी सांगितले. आंदोलनात शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, शहर संघटक, नगेंद्र रोहणकार, नगरसेवक गणेश सोनोने, योगेश आळशी, प्रसाद एदलाबादकर, मयूर घाडगे, रोहन जैस्वाल,  यश आमले, विक्की हट्टेल, कल्पेश बजाज, शशांक वक्टे, रुपेश शर्मा, विकास चवरे, बापू देशमुख, श्रीकांत जोशी, भावेंद्र दुबे, मोहित ठाकूर, पवन तनपुरे, नीलेश हातेकर, हितेश पदमगीरवार, मुन्‍ना पेसोडे, सोनु नेभवाणी, लोकेश वानखडे, विनय शर्मा, पंकज सरकटे, विजय पदमगिरवार, निखिल नथ्थानी, हरीष सारसर, रमेश इंगळे, रोशन गायकवाड, आकाश बडासे  यांच्यासह भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थ‍ित होते. प्रसुती विभागात असे प्रकार पुन्हा घडल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करून रुग्णांना न्याय मिळवून देऊ, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.