बिनबुलाये मेहमान... शासकीय कार्यक्रमात मिरवतात तरी कशाला?; बोंद्रे, उमाळकर, सानंदा निमंत्रण नसतानाही "महावितरण'च्या स्टेजवर!!
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल खामगाव येथील विद्युत भवन येथून आभासी पद्धतीने मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथील अतिउच्चदाब उपकेंद्राचे लोकार्पण केले. शेगाव तालुक्यातील मनसगाव येथील उपकेंद्राचेही भूमिपूजन केले. या शासकीय कार्यक्रमाला नियमाप्रमाणे जिल्ह्यातील आमदार, खासदार यांना निमंत्रित केले होते. धरणगाव रावेर लोकसभा क्षेत्रात असल्याने तिथल्या खासदार रक्षाताई खडसे यांनासुद्धा महावितरणच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्षात राजेश एकडे वगळता इतर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. मात्र काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. एवढेच नाही तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्यामबाबू उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा निमंत्रित नसतानासुद्धा शासकीय स्टेजवर विराजमान झाल्याचे दिसून आले. त्याहीपलीकडे जात शासकीय स्टेजवर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अध्यक्षांनी मंत्रीमहोदयांचा सत्कार केला. या कार्यक्रमाच्या आधी त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तिथे गळ्यात घातलेला पक्षाचा रुमाल या शासकीय कार्यक्रमात सुद्धा राजेश एकडे आणि राहुल बोंद्रे यांनी गळ्यातून उतरवला नाही. त्यामुळे ऊर्जा मंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यात पक्षाची पदे मिरवणाऱ्या नेत्यांचा उदोउदो कशासाठी, असा सवाल सामान्यांकडून व्यक्त होत आहे.