मानलेल्या भाचीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामाला ३ वर्ष १० महिन्यांचा कारावास! खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

 
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मामा - भाचीच्या नात्याला काळीमा फासून मानलेल्या बहिणीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम मामाला ३ वर्षे १० महिन्यांची शिक्षा  ठोठावण्यात आली. काल,१२ एप्रिल रोजी खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिला.

श्रिकिसन राठी (४६, रा. हिंगणघाट, जि. वर्धा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी श्रीकिसन राठी याने खामगाव येथील एका महिलेला बहीण मानले होते. तिच्या मुलगी आणि मुलगा त्याला मामा म्हणत होते. २९ मे २०१८ ते ३ जून २०१८ या कालावधीत श्रीकिसन राठी , त्याची पत्नी व मानलेली भाची आणि भाच्याला घेऊन शिर्डी, त्र्यंबकेश्वर, शेगाव येथे फिरायला गेले होते. तिथे राठी याने लॉजवर मुक्काम केला होता .

त्याचवेळी त्याने मानलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केला होता. हा प्रकार असह्य झाल्याने ४ जूनला पीडित मुलीने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून श्रीकिसन राठी व त्याला गैरकृत्यात साथ देणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

 खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती वैरागडे यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीअंती आरोपीच्या पत्नीची मानसिक रोगी म्हणून निर्दोष सुटका करण्यात आली तर आरोपी श्रीकिसन राठी याला ३ वर्षे १० महिन्यांची शिक्षा  व २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंडाच्या रकमेपैकी १५ हजार रुपये मुलीला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले होते. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. वसंत भटकर यांनी काम पाहिले.