डोळ्यात मिरची पावडर फेकून दागिन्यांच्या व्यापाराला लुटले!; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार येथे रोहिणखेड येथील विजय नारायण सुरपाटणे (५२) यांचे अलंकार ज्वेलर्स नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. दुकान बंद करून ते सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन दुचाकीने घराकडे जात होते.
लालमाती ते रोहिणखेड रोडवर लालमाती शिवारात दोन चोरट्यांनी पाठलाग करून त्यांची दुचाकी अडवली. त्यांच्या डोळ्यांत मिरची पावडर फेकून दागिने आणि रोख रकमेची बॅग हिसकावून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, धामणगाव बढेचे ठाणेदार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
या वेळी दरोडेखोरांना तातडीने गजाआड करावे, अशी मागणी करण्यासाठी मोठा जमाव घटनास्थळी जमला होता. व्यापारी विजय सुरपाटणे यांच्या तक्रारीवरून धामणगाव बढे पोलीस ठाण्यात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली धामणगाव बढेचे ठाणेदार चंद्रकांत ममताबादे करत आहेत.