अन् सावरगावचे तिघे पाण्याच्या टाकीवर चढले; पोलीस आल्यावर...

 
जळगाव जामोद ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  अतिक्रमण हटविण्याच्या  मागणीसाठी जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव येथील ३ ग्रामस्थांनी  आज, ३१ मार्च पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. सावरगाव येथील बाबुराव पाटील , भागवत कराळे, सीताराम कडरकार यांच्या घराकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण आहे. त्यामुळे त्यांना घरी - येजा करण्यासाठी त्रास होत होता. त्यांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समितीला निवेदन दिले मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती.
 प्रशासन मागण्यांकडे  दुर्लक्ष करीत असल्याने त्यांनी शोले स्टाईल  आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आंदोलन सुरू झाल्यावर जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.