चोरट्यांनी हद्द केली राव..! खामगावच्या विश्रामगृहातील स्वयंपाकाची भांडी गायब; पाहुण्यांनी जेवायचे तरी कसे?
Apr 15, 2022, 09:40 IST
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव येथील विश्रामगृहातून स्वयंपाकाची भांडी गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विश्रामगृहाच्या खानसाम्याने १३ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गणेश त्र्यंबक शिंगोटे (३९) हे खामगाव येथील विश्रामगृहावर खानसामा म्हणून नोकरी करतात. विश्रामगृहावर आलेल्या अधिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे . स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली भांडी त्यांनी त्यांच्या कॉटरच्या पाठीमागील आवारात ठेवली होती. १३ एप्रिल रोजी सकाळी त्यांना भांडी दिसली नाहीत. गंज, नास्ता प्लेट, स्टील चे ग्लास, जेवणाचे ताट, थरमास, चहाचा गंज, सराटा, चमचे असे एकूण ११ हजार १०० रुपयांचे भांडे चोरीला गेल्याची तक्रार खामगाव शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.