बुलडाणा जिल्ह्यातल्या या ४ गावांना जायचय मध्यप्रदेशात! गावकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; म्हणाले,इथे राहून आमचा काय फायदा..!

 
naka
जळगाव जामोद:(ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात सध्या सीमावादाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. कर्नाटक आणि महाराष्ट्रात सीमेवरून वाद पेटलाय. तिकडे उत्तर महाराष्ट्रातील विकासाअभावी गुजरात राज्यात भूमिका घेतलीय. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील ४ गावांनी  मध्यप्रदेशात जायची भूमिका घेतली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही आमच्या आदिवासींच्या आयुष्यात अंधारच आहे. शासन प्रशासनाने विकासाबाबत काहीही केले नाही त्यामुळे आमचा महाराष्ट्रात राहून काय फायदा, त्यापेक्षा आमची गावे मध्यप्रदेशात समाविष्ट करा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

या आदिवासीयांच्या गावात स्वातंत्र्यानंतर अद्यापपर्यंत कुठलीच मूलभूत सुविधा मिळाली नाही. विज, शिक्षण, आरोग्य व रस्ते या लोकांना कधीच मिळाले नाही. यासाठी आदिवासी नागरिकांनी बरेच आंदोलने केली. परंतु, अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही. असंख्य निवेदन देवून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या ही मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र प्रशासनाला किंवा शासनाला जाग आलीच नाही. म्हणून अश्या जिल्ह्यात व राज्यात कसे राहायचे असा विचार आदिवासी बांधवांच्या मनात आला. म्हणून शेवटी कंटाळून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आमच्या चार गावांना मध्यप्रदेश या राज्यात सामील करा असे पत्रच देण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेले आदिवासी भागातील जळगाव जामोद तालुक्यातील चार गावांना गेल्या ७५ वर्षात कुठल्याही मूलभूत सुविधा मिळाली नाही. यामुळे आता वैतागून चार गावातील ग्रामस्थांनी आमच्या गावांचा मध्यप्रदेशमध्ये समावेश करण्याची मागणी बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यात आज बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील भिंगारा, गोमाल १, गोमाल २ व चालीस टपरी अश्या चार आदिवासी बांधवांचे वास्तव्य असलेल्या गावातील ग्रामस्थानी मध्यप्रदेशमध्ये सामील करण्याची मागणी राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.