कंटेनरने अ‍ॅपेला चिरडले; तिघे जागीच ठार! मलकापूर तालुक्यातील दुर्घटना

 
मलकापूर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कंटेनरने अ‍ॅपेला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मलकापूर - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ आज, ११ एप्रिल रोजी सकाळी ११वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे येणाऱ्या भरधाव कंटेनरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या अ‍ॅपेला जबर धडक दिली. या अपघातात अ‍ॅपेचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि अ‍ॅपेचालकासह दोन जण जागीच ठार झाले. गोविंद श्रावण जाहीर (२५, रा. शिवतारा ता.  हदगांव, जि. नांदेड, हमु धाड नाका, बुलडाणा) असे अपघातात ठार झालेल्या   अ‍ॅपेचालकाचे नाव आहे. तर अयुबखान अजुद्दीखान (४८, रा. लोणीदेहात, जि. गाझियाबाद , उत्तरप्रदेश) व  नफिसखान अलीजानखान  (२४, रा.पिंडोरा , जि. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) अशी ठार झालेल्या अन्य दोघांची नावे आहेत.

त्यांचा बॅग विक्रीचा असल्याने ते बॅग विक्रीसाठी बुलडाणा येथून अ‍ॅपेने मुक्ताईनगरकडे जात होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत केली. मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून ठार झालेल्या तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. अपघातास कारणीभूत ठरलेला कंटेनरचालक अपघातानंतर पसार झाला.