पोहण्यासाठी विहिरीत उडी घेतलेला मुलगा बुडाला!; खामगाव तालुक्यातील घटना

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोहण्यासाठी विहिरीत उडी घेतलेला १८ वर्षीय मुलगा बुडाल्याची घटना खामगाव तालुक्‍यातील टाकळी तलाव शिवारात ३ मार्चला दुपारी घडली. रात्री आठच्या सुमारास गळाच्या साह्याने त्‍याचा मृतदेह वर काढण्यात यश आले. काल, ४ एप्रिलला त्‍याच्यावर टाकळी तलाव येथे अंत्‍यसंस्कार करण्यात आले.

शुभम अनिल इंगळे (रा. टाकळी तलाव) असे मृत्‍यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो १२ वीत होता. त्‍याचे आई-वडील मजुरीसाठी मुंबईला गेलेले असल्याने तो आजीकडे राहत होता. गावाशेजारील प्रभु तिजारे यांच्या शेतातील विहिरीत गावातील मुले रोज पोहण्यासाठी जातात. शुभमही मित्रांसोबत पोहायला जात होता.

३ एप्रिलला दुपारी त्‍याने विहिरीत पोहण्यासाठी उडी घेतली. मात्र बराच वेळ होऊनही वर आला नाही. त्‍यामुळे पोहणाऱ्या तरुणांनी त्‍याचा शोध सुरू केला. मात्र तो मिळून आला नाही. गावात ही माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन रात्री ८ च्या सुमारास ग्रामस्‍थांच्या मदतीने गळाच्या साह्याने शुभमचा शोध घेतला. तेव्हा गळाला अडकून मृतदेह वर आला.