भीषण दुर्घटना... जोरदार धडक होऊन टँकर- ट्रेलर पेटले!; दोन्ही चालकांचा कोळसा; नांदुरा तालुक्‍यातील घटना

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : टँकर आणि ट्रेलरची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांना आग लागली. आगीत दोन्ही वाहनांच्या चालकांचा जळून कोळसा झाला. काल, ४ एप्रिलला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मलकापूर- नांदुरा रोडवरील चांदुरबिस्वा फाट्यावर ही घटना घडली.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार ट्रेलर (क्र. आरजे ०९ जीबी १५०३) नांदुऱ्याकडून मलकापूरला जात होते, तर टँकर (जीजे ०४ एडब्ल्यू २१९१) मलकापूरहून नांदुऱ्याकडे जात होते. दोन्ही वाहनांची चांदुरबिस्वा फाट्याजवळ धडक झाली. अपघातानंतर वाहनाला लगेच आग लागली. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

नांदुरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आगीत दोन्ही चालकांचा जळून अक्षरशः कोळसा झाल्याने ओळख पटत नव्हती. अखेर आज सकाळी एकाची ओळख पटली असून तो राजस्थानचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेह नांदुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपास नांदुरा पोलीस करीत आहेत.