दहावीतल्या मुलीचे अपहरण! कॉम्पुटर क्लासला गेली होती; खामगाव शहरातील घटना

 
4565
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कॉम्पुटर क्लासला गेलेल्या दहावीतल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना खामगाव शहरातील दालफैल भागात समोर आली आहे. मुलीच्या आईने खामगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी १७ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खामगाव शहरातील दालफैल भागात राहणाऱ्या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार मुलगी १६ एप्रिलरोजी सकाळी ११ वाजता कॉम्प्युटर क्लासला जाते असे सांगून निघून गेली. दुपारी ३ पर्यंत घरी येणार असल्याचे तिने तिच्या आईला सांगितले होते. मात्र दुपारी ३ पर्यंत ती घरी आली नाही. मुलीच्या आईने तिच्या फोन नंबरवर फोन करून बघितला मात्र तिचा नंबर बंद येत होता.

तिच्या आईने कॉम्पुटर क्लासला जावून बघितले क्लास बंद होता. क्लास चालविणाऱ्या संचालिकेला विचारणा केली असता तुमची मुलगी क्लासला आलीच नसल्याचे त्यांनी सांगितले. नातेवाईकांनी सगळीकडे शोध घेऊनही मुलगी मिळून न आल्याने अज्ञात आरोपीने अपहरण केल्याचा संशय मुलीच्या आईने तक्रारीत व्यक्त केला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.