वडनेर भोलजी प्राथमिक आरोग्य केंद्राला शिवसेनेने ठोकले कुलूप!

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलाजी प्राथमिक आरोग्य केंद्रात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने अनेकदा रुग्णांची गैरसोय होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर हे आरोग्य केंद्र आहे. त्‍यामुळे अपघातांचे सर्व रुग्ण सर्वांत आधी याच केंद्रात आणले जातात. अशावेळी अपुऱ्या कर्मचारीसंख्येमुळे मोठा ताण होतो. रुग्णांच्या नातेवाइकांच्या संतापाला कर्मचारी वर्ग बळी पडतो. केंद्रातून ११ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर त्‍याबदल्यात एकही कर्मचारी रूजू झाला नाही. पुरेशा स्‍टाफ भरण्याच्या मागणीसाठी या केंद्राला शिवसेनेतर्फे कुलूप ठोकून काल, १ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले.

56


आरोग्य केंद्रातील रिक्‍त जागा भरण्यावर निर्णय घेण्यासाठी ४ दिवसांची मुदत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिली होती. मात्र त्‍यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्‍यामुळे वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, सरपंच संतोष दिघे यांनी सांगितले. आंदोलनात सोपान पाटील, ईश्वर पांडव, अनंता सातव, दीपक जुमळे, सहदेव दिवनाले, श्रीकृष्ण नारे आदींनी भाग घेतला.

ग्रामस्‍थ आरोग्य केंद्रात आंदोलनासाठी आल्याची माहिती मिळताच वडनेर भोलजी पोलीस चौकीचे शिवाजीराव अरबट, श्री. राठोड यांनी बंदोबस्तासाठी धाव घेतली. यावेळी बुलडाणा जिल्हा परिषदेचे अधिकारी कोणताही मागचा पुढचा विचार न करता कर्मचाऱ्यांच्या पैसे घेऊन बदल्या करतात. मागील वर्षी तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पैसे खावून एकाच झटक्यात वडनेर भोलजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ११ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. जोपर्यंत रिक्‍त जागा भरल्या जात नाहीत तोपर्यंत वडनेर आरोग्य केंद्र बंद राहील, असे सरपंच संतोष दिघे यांनी सांगितले.