लग्नात सत्कारासाठी नाव न घेतल्याचा शिवसेना नेत्याला आला राग! सुत्रसंचालकाच्या घरावरच केला हल्ला! ६ जण जखमी; मोताळा शहरातील घटना
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल, १९ एप्रिल रोजी मोताळा येथील गुरुप्रसाद लॉनमध्ये एक लग्न होते. या लग्नाचे सूत्रसंचालन बोराखेडी येथील प्रियदर्शनी कॉलेजवर शिक्षक असलेले तसेच पत्रकार असलेले गणेश झंवर (५२) यांच्याकडे होते.या लग्नाला सामाजिक,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील बऱ्याच मान्यवरांनी हजेरी लावली होती. सुत्रसंचालन करीत असतांना माळी कुटुंबियांच्या सांगण्याप्रमाणे गणेश झंवर हे उपस्थित मान्यवरांची सत्कारासाठी नावे घेत होते.
तेव्हा मोताळा नगरपंचायत निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले शरद पाटील यांचे नाव अनावधानाने गणेश झंवर यांच्याकडून सुटले. ही गोष्ट शरद पाटील यांना खटकली व नाव न घेतल्याचा त्यांना प्रचंड राग आला. लग्नमंडपातच शरद पाटील यांनी गणेश झंवर यांच्याजवळ जाऊन त्यांच्याशी हुज्जत घातली. माझे नाव सत्कार समारंभात का घेतले नाही ,मी तुला पाहून घेईन अशी धमकी देत तिथून निघून गेले. लग्न आटोपल्यानंतर गणेश झंवर हे त्यांचे चुलत भाऊ भिकमचंद झंवर यांच्याकडे बसलेले असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. आपल्या घरासमोर काही लोक हातामध्ये रॉड घेऊन कुटुंबाला शिवीगाळ करीत असल्याचे गणेश झंवर यांना सांगितले.
त्यामुळे गणेश झंवर तात्काळ घरी पोहचले असता शिवसेना नेते शरद पाटील, सुहास वसंतराव पाटील, प्रविण पाटील, प्रकाश पाटील, समर्थ पाटील व २ अनोळखी घरात राडा घालत असल्याचे त्यांना दिसले. पाटील यांनी गणेश झंवर यांची पत्नी, दोन मुली व झंवर यांच्या वहिनी शिवसेनेच्या नगरसेविका अनिता झंवर यांना लोटपोट करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे गणेश झंवर यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर शरद पाटील याने गणेश झंवर यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. प्रकाश पाटील यानेही गणेश झंवर यांना लाकडी दांडक्याने मारले.
गणेश झंवर यांचा भाऊ धनराज झंवर, पुतण्या सौरभ झंवर , मुलगा विवेक झंवर यांना सुद्धा पाटील गटाने मारहाण केली. मी तुम्हाला पाहून घेईन, तुम्हाला सोडणार नाही अशा धमक्या शरद पाटील देत होत्या . यावेळी तिथे जमा झालेल्या काहींनी हे भांडण सोडविले . जखमींवर मोताळा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
डॉक्टरांनी अशोक झंवर, धनराज झंवर व दोन्ही मुलांना बुलडाणा रेफर केले. त्यानंतर रात्री १२ नंतर याप्रकरणी गणेश झंवर यांच्या तक्रारीवरून शरद वसंतराव पाटील, सुहास वसंतराव पाटील, प्रविण शरद पाटील, प्रकाश चंद्रशेखर पाटील, समर्थ सुहास पाटील व अन्य दोघे अशा ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी आणि फिर्यादी हे शिवसेनेशी संबधित असल्याने शिवसेनेच्याच दोन गटात हा वाद रंगला आहे.