खामगावच्या त्‍या कॅफेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र कॅबीन, तासन्‌ तास चालतात अश्लील चाळे!; संतप्त नागरिक एकवटले!!

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव शहरातील विठ्ठलनगर, अमृतनगरातील नागरिक सध्या प्रचंड संतप्त आहेत. जलंब रोडवरील कुलस्वामिनी प्राईड अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर सुरू झालेल्या कॅफेत मुला- मुलींसाठी स्वतंत्र कॅबिन तयार केल्या असून, त्‍यात तास न्‌ तास कॉलेजच्या मुला-मुलींचे अश्लील चाळे सुरू असतात, असा आरोप करत नगरसेवक विलासराव देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली एकत्र येत नागरिकांनी खामगाव शहर पोलीस ठाण्याला निवेदन दिले. पोलिसांनी तातडीने ही अनैतिक कृत्‍ये बंद केली नाही तर नागरिकांच्या संतापाचा स्‍फोट झाल्याशिवाय राहणार नाही इथपर्यंत या भागातील परिस्थिती बिघडली आहे.

निवेदनात नागरिकांनी म्‍हटले आहे, की काही महिन्यांपासून हा कॅफे सुरू आहे. त्‍यात मुला- मुलींसाठी कॅबिन तयार करण्यात आल्या असून, तेथे त्‍यांना एकत्र बसण्याची व नाश्त्या पाण्याची सोय केलेली आहे. तास न्‌ तास मुले- मुली या कॅबिनमध्ये ठाण मांडून असतात. यासाठी त्‍यांच्याकडून मोठी रक्‍कम तासाप्रमाणे आकारली जाते. याद्वारे मुला- मुलींना अश्लील चाळे करण्यास प्रवृत्त केले जात असून, या ठिकाणी कॉलेजची मुले- मुली एकत्र येऊन अश्लील कृत्‍य करतात. याचा रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे.

या कॅफेवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे. निवेदनाची प्रत कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक विलासराव देशमुख, ज्ञानदेवराव मानकर, डॉ. पंकज जोशी, डॉ. शरद गावंडे, पंकज गिरी, श्रीकांत बाळकर, अतुल भावसार, शत्रुघ्न कुटे, अमोल राठोड, अजय ताकवाले, दिनेश केचकर, करणसिंग जाधव, एस. ए. गुजर, एच. एन. देशमुख, आर. के. कऱ्हाळे, प्रशांत इंगळे, ए. व्ही. मिरगे, पवन भावसार, संदीप राजपूत, जीवन कळसकार, नीलेश भोपळे, सुरेश पाटील, अशोक देशमुख, डॉ. आर. एस. सातव यांच्यासह ५६ नागरिकांच्या सह्या आहेत.

जिल्हाभरात कॅफेचे पेव
जिल्हाभरात सध्या अशा प्रकारच्या कॅफेंचे पेव फुटले आहे. तरुण- तरुणींना कॅफेत तास न्‌  तास कॅबिन उपलब्ध करून दिली जाते. काही दिवसांपूर्वी शेगावमध्ये एका मुलीवर कॅफेत लैंगिक अत्‍याचार झाल्याची घटना समोर आली होती. त्‍यानंतर पोलीस प्रशासनाने सर्वच शहरांतील कॅफेचालकांची बैठक घेऊन अनैतिक गोष्टी थांबविण्यासाठी दम भरला होता. मात्र काही नियम पाळल्यानंतर पुन्हा मागचे पाढे पचावन्न असा प्रकार सुरू झाला आहे. जिल्ह्यात सध्या मुले-मुली पलायनाच्या घटना वाढल्या असून, त्‍याचा उगमही अशा प्रकारच्या कॅफेतून होत असल्याचा आरोप पालकांतून होत असतो.