जवान कैलास कापरे यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप!; शासकीय इतमामात सुनगावला आले अंत्यसंस्कार
Feb 11, 2022, 09:33 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुनगाव (ता. जळगाव जामोद) येथील रहिवासी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) जवान कैलास नारायण कापरे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव सुनगावला आणल्यानंतर ९ फेब्रुवारीला रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. स्वर्गरथ फुलांनी सजवलेला होता. महिलांनी रस्त्यावर रांगोळी काढून जवानाप्रती आदरभाव व्यक्त केला. सुनगाव ते जळगाव जामोद रोडवरील जवानाच्या मळ्यात अखेरची सलामी घेत जवान कापरे अनंतात विलिन झाले.
जवान कैलास कापरे हे चंद्रपूरच्या महाऔष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत होते. टिप्परच्या धडकेने ८ फेब्रुवारीला सायंकाळी चंद्रपूरजवळ त्यांचा मृत्यू झाला होता.
ते मूळचे सुनगावचे असल्याने पार्थिव सुनगावला आणण्यात आले. बुलडाणा येथील जवानांनी त्यांना हवेत फैरी झाडून अखेरची सलामी दिली. अंत्यसंस्कार प्रसंगी आमदार डॉ. संजय कुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसेनजीत पाटील, शिवसेनेचे दत्ता पाटील, काँग्रेसचे अविनाश उमरकर, जिल्हा परिषद सदस्य रूपाली काळपांडे, पंचायत समिती सभापती रामेश्वर राऊत, उपसभापती महादेवराव धुर्डे, सरपंच रामेश्वर अंबडकार, पुंडलिक पाटील यांच्यासह हजारो नागरिकांची उपस्थिती होती. जवान कापरे यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.