उभ्या कपाशी व सोयाबीनच्या पिकात रोह्यांचा हौदास; खामगाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत,वन विभागाने लक्ष देण्याची गरज..

 
खामगाव (भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नेहमीच अस्मानी संकटाला तोंड देणाऱ्या बळीराज्याला वन्यप्राणांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. त्यातच खामगाव तालुक्यात रोही या वन्यप्राण्याचा त्रासही तेथील शेतकरी बांधवाना मोठ्या प्रमाणात वाढला आहे.या त्रासाला कंटाळलेले शेतकरी दरवर्षी वनविभागाकडे तक्रारी करूनही उपयोजना केल्या जात नसल्याची तक्रार शेतकरी बांधवांकडून होत आहे. 

शेताच्या होणाऱ्या नुकसानीकडे हतबलतेने पाहण्यावाचून शेतकऱ्यांकडे कोणताच पर्याय राहिलेला नाही. खामगाव तालुक्यात रोही हा प्राणी मोठ्या प्रमाणावर आढळतो. एका कळपात साधारण २०० ते ३०० रोही आहेत. एक कळप एखाद्या शेतात शिरला तर शेतातील  संपूर्ण पीक उध्वस्त होते.  रोह्यांपासून पीक वाचवण्यासाठी रात्रभर शेतकऱ्यांना जागरण करावे लागते. रात्री बेरात्री शेतकऱ्यांना उठून शेतात जावे लागत असल्याने घरचेही चिंतेत असतात. मात्र शेतकऱ्यांची चिंता कुणालाच दिसत नाही.

१५ जुलै रोजी खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील शेतकऱ्यांच्या शेतात रोह्यांनी अक्षरशः हौदास घातला .गजानन राऊत, संजय काळाने,सागर राऊत,सागर भिसे,विठ्ठल वरनकार, राहुल जिरंगे,भागवत सुशीर,पका मोरे,बाळू खाडपे, गणेश नागलकर,बाळू काळणे, बाळू ठोंबरे, विठ्ठल काळणे, नितीन भारसाकळे,गोपाळ भारसाकळे, बाळू जिरंगे,वामन पारसकार,शंकर जिरंगे,बाळू मोरे, लक्ष्मण काळे, ज्ञानेश्वर शेलकर
यांच्या शेतात रोह्याने हौदास घालत उभ्या पिकांचे नुकसान केले आहे. वनविभागाने यावर त्वरित उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला आळा घालावा, अशी मागणी टेंभुर्णा येथील शेतकरी बांधव यांच्याकडून होत आहे.