सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशांचे शेगावमध्ये घर हडपण्याचा प्रयत्‍न!; पाडापाडी करून साहित्‍य नेले चोरून!!; तिघांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांत तक्रार

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः  मूळचे शेगाव येथील भीमनगरातील रहिवासी असलेले व सध्या औरंगाबादमध्ये विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेले सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश देवराव शेगोकार यांचे शेगावमधील घर हडपण्याचा प्रयत्‍न तिघांनी केला आहे. पाडापाडी करून घरातील सामानही तिघांनी चोरून नेल्याची तक्रार शेगोकार यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

देवराव जगदेव शेगोकार (६४) मूळचे शेगावच्या भीमनगरातील रहिवासी आहेत. ते सध्या कुटुंबियांसह काही वर्षांपासून औरंगाबादला राहतात. त्‍यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशिक मनोहर शेगोकार (२८), त्याचा भाऊ गणेश उर्फ अंकुश मनोहर शेगोकार (२३), त्यांची आई सौ. रेखाबाइ मनोहर शेगोकार (४८, सर्व रा. भीमनगर शेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देवराव शेगोकार यांची भीमनगरात वडिलोपार्जित घर व जागा असून, त्यावर जुना लागडी ढाचा उभा होता.

घराला लागून असलेल्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्‍यांचे वडील जगदेव गणपत शेगोकार यांनी एक १२ बाय १५ ची खोली बांधली होती. या घरात देवराव शेगोकार यांनी त्‍यांना रंगीत टीव्ही, फ्रीज, सोफा, लोखंडी पलंग, लोखंडी पेटी, दोन फॅन (एकूण किंमत १५ हजार ९०० रुपये) त्‍यांना वापरासाठी दिले होते. प्रशिक हा भारतीय सैन्यात नोकरीला असून, तो ऑक्टोबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात शेगावला सुटीवर आला होता. प्रशीक, गणेश व त्यांच्या आईने मिळून देवराव शेगोकार यांच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या.

ही बाब वडिलांनी बहीण सुमन भोजने (रा. अकोला) यांना मृत्यूच्या चार ते पाच दिवसांपूर्वी सांगितली होती, असे तक्रारीत देवराव शेगोकार यांनी म्‍हटले आहे. ७ मार्चला अकोला येथे जगदेव शेगोकार वारले. ९ मार्च २०२२ रोजी प्रशिक पुन्हा शेगावला सुटीवर आला. २५, २६ मार्चला प्रशिक, गणेश व त्‍यांच्या आईने मिळून देवराव शेगोकार यांची वडिलोपार्जीत मालकी हक्काची घर जागा तसेच त्‍यांच्या पुतणीची मालकी हक्काची घर जागा व वडिलांनी अतिक्रमण केलेली शासकीय जागा बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्याचा कट रचला.

त्‍यांनी जुना लाकडी ढाचा, पुतणी आकांक्षाच्या जागेवरील टिनपत्रे असलेली छपरी तसेच शासकीय जागेवरील खोली पाडली, असे तक्रारीत देवराव शेगोकार यांनी म्‍हटले आहे. तीनही जागा बळकावण्यासाठी त्‍यांनी ही पाडापाडी केली. यात २९ हजार ९०० रुपयांचे नुकसान केले. घरातील साहित्य चोरून नेले, असेही तक्रारी देवराव शेगोकार यांनी म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी प्रशिक, गणेश व त्‍यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोहेकाँ श्री. वानखेडे करत आहेत.