शेगावात हिंदुत्ववादी संघटना अन् पोलीस आमने सामने; हिंदु युवकांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप; आमदार डॉ कुटे म्हणाले, पोलिसांनी रिकाम्या भानगडीत पडू नये !

 
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पोलिसांनी शेगाव शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करावे. रिकाम्या भानगडीत पडू नये असा  इशारा आमदार डॉ संजय कुटे यांनी  दिला आहे. १३ एप्रिल रोजी रात्री विनापरवाना सुरू असलेल्या एमटीडीसी परिसरातील आनंद मेळा परिसरात  झालेल्या वादावरून पोलिसांनी  हिंदुत्ववादी संघटनेच्या ८ ते ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.  हिंदुत्ववादी युवकांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप  आमदार डॉ संजय कुटे यांनी केला. हे गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल , भारतीय जनता पार्टी व इतर सर्व हिंदुत्ववादी सघटनांनी  शेगावातील गांधी चौकात आज ,१५ एप्रिल रोजी  सकाळी ९ ते १२ या वेळेत धरणे आंदोलन केले.यावेळी आमदार डॉ संजय कुटे यांनी पोलिसांना रिकाम्या भानगडीत न पडण्याचा इशारा दिला. 

 पोलीसांनी केलेली कारवाई द्वेष भावनेने प्रेरित आहे असे म्हणत त्यांनी या कारवाईचा निषेध केला. आता हिंदू माता भगिनींनी जुडो कराटे व लाठ्या-काठ्या शिकाव्या व अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा असेही आमदार डॉ कुटे म्हणाले.बजरंग दलाचे प्रांत संयोजक अमोल अंधारे यांनीसुद्धा यावेळी पोलीस प्रशासनाचा निषेध केला.

रामनवमी नवमी निम्मित काढलेल्या मिरवणुकीचा राग मनात ठेवून द्वेष भावनेने हिंदुत्ववादी युवकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा व इतर गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवून त्यांच्या विरुद्ध खोट्या केसेस दाखल केल्याचा आरोप अमोल अंधारे यांनी केला . जोपर्यंत निर्दोष हिंदूत्ववादी युवकांना न्याय  मिळत नाही तोपर्यंत हिंदुत्ववादी संघटना स्वस्थ बसणार नाही असेही अमोल अंधारे म्हणाले.

 यावेळी माजी नगराध्यक्षा शकुंतला बुच, शरद अग्रवाल, माजी उपसभापती पवन  शर्मा, गजानन जवंजाळ, दीपक शर्मा, माजी नगरसेवक प्रदीप सांगळे, संजय कलोरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष देशमुख, तालुकाध्यक्ष विजय भालतडक, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, माजी शहराध्यक्ष डॉ मोहन बानोले, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस कल्पना मसणे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष डॉ ज्योती भूतडा, दीपक धमाल, कमलाकर चव्हाण,  डॉ राजेश सराफ, पुरुषोत्तम हाडोळे, प्रमोद काठोळे यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.