मंडप डेकोरेशनचे सामान पेटवून दिले!; सात लाखांचे नुकसान; दोघांवर संशय, खामगाव तालुक्यातील घटना
भास्कर नामदेव गाडे (६०, रा. बोरजवळा) यांचा शेती व मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. डेकोरेशनचे सामान त्यांनी टिन शेडमध्ये ठेवले होते. २५ जानेवारीला सकाळी ते शेतातून हरभरा पिकाला पाणी देऊन घरी आले. त्यानंतर टिनशेडकडे चक्कर मारण्यासाठी गेले. त्यावेळी टिनशेडचे लोखंडी कुलूप त्यांना तुटलेले दिसले. आजूबाजूला लोक जमले होते. आतून धूर येत होता. गाडे यांनी आत जाऊन पाहिले असता मंडप डेकोरेशनच्या साहित्याला आग लागल्याचे त्यांना समजले.
उपस्थित गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत लग्न समारंभाचे ७ लाख रुपयांचे साहित्य जळून गेले होते. काल, १ फेब्रुवारी रोजी याप्रकरणात तक्रार देण्यात आली. ही आग गावातीलच उत्तमसिंग लयसिंग तोमर व हिम्मतसिंग तोमर यांनीच लावल्याचा संशय असल्याचे गाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.