पिंप्री गवळीत भीषण आगीत दोन घरांची उरली केवळ राख!; तिसऱ्या घराचेही मोठे नुकसान, दोन कुटुंब आले उघड्यावर, खामगाव तालुक्यातील घटना
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्री गवळी येथील परमेश्वर काशिराम बंड, नरेंद्र रामदास आल्हाट व मनोहर नानाजी इंगळे यांच्या घरांना आज दुपारी १२ च्या सुमारास आग लागली. आग लागली त्यावेळी घरातील लोक बाहेर असल्याने जीवितहानी टळली. आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीने प्रयत्न केले. टँकर आणून नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
खामगाव येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत आगीत परमेश्वर बंड आणि नरेंद्र आल्हाट यांची घरे पूर्णपणे जळून गेली. जीवनावश्यक साहित्यासह सर्वच खाक झाल्याने ही दोन्ही कुटुंब उघड्यावर आली आहेत, तर मनोहर नानाजी इंगळे यांच्या घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आगीमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबियांना तातडीने मदत करण्याची मागणी होत आहे.