ओबीसींची वज्रमूठ! शेगावमध्ये अधिकार संमेलन!! छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल म्हणाले, ओबीसींचे आरक्षण दडपण्यासाठी मोदी सरकार करतेय खासगीकरण..!

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सार्वजनिक हिताच्या सरकारी संस्थांचे खासगीकरण करून ओबीसी समाजाच्या सर्व सवलती बंद करण्याचे कारस्थान केंद्रातील मोदी सरकार करीत आहे. ओबीसी प्रवर्ग नेहमी मागास रहावा यासाठी भाजप आणि मोदी सरकार आटोकाट प्रयत्नरत आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांनी एकत्रित येऊन लढा आणखी तीव्रतेने उभारून हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवावा आणि मोदी सरकारचे ओबीसी समाजाच्या विरुद्धचे षड्‌यंत्र हाणून पाडावे, असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.

शेगावमध्ये आज, २८ मार्चला आयोजित ओबीसी अधिकार संमेलनात ते बोलत होते. स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्डात ओबीसी अधिकार संघर्ष समितीतर्फे हे संमेलन घेण्यात आले. संमेलनाचे उद्‌घाटन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अध्यक्षस्थानी होते. यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आमदार अमित झनक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार राजेश एकडे, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संजय राठोड, श्याम उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, रामविजय बुरुंगले, जयश्री शेळके, डॉ. स्वाती वाकेकर, देवानंद पवार, ज्ञानेश्वर दादा पाटील, संमेलनाचे निमंत्रक मंगेश भारसाकळे, पांडुरंग पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

या वेळी मुख्यमंत्री बघेल म्हणाले, की केंद्रातील मोदी सरकारने विकण्याचा उद्योग सुरू केला आहे. रेल्वे, विमान, एलआयसी यांसारख्या कंपन्या विकल्याने आज शासकीय नोकऱ्या मिळवणे कठीण झाले आहे. शासकीय कंपन्या उरल्या नाहीत तर ओबीसी समाजाच्या सुशिक्षित पिढीला नोकऱ्या मिळतील तरी कशा?, असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला. त्यामुळे मोदी सरकारला कंपन्या विकण्यापासून रोखावेच लागेल तर नोकऱ्या वाचतील, असे बघेल म्हणाले. भाजपचे राजकारण जाती विद्वेषाचे राजकारण आहे. दोन समाजांत जातीय विद्वेष निर्माण सत्ता उपभोगणारा भाजप आहे. त्यामुळे विकासाच्या राजकारणासाठी ओबीसी समाजबांधवांनी काँग्रेसमागे भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन बघेल यांनी केले.

संतनगरीतून सुरू झालेला लढा यशस्वी होईलच : नाना पटोले
ओबीसी समाज कधीच आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ नये असा चंग मोदी सरकारने बांधलेला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने आपले अधिकार आणि हक्काची लढाई  लढावी. आपले आरक्षण कायम ठेवण्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकजुटीने हा लढा तीव्र करावा. संतनगरी शेगावातून श्रींच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या लढ्याला नक्कीच यश मिळेल, असे नाना पटोले म्हणाले.

भाजपचे ओबीसी प्रेम बेगडी यशोमती ठाकूर
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या ओबीसी समाजाच्या होत्या. त्यामुळे भाजपच्याच लोकांनी पंकजा मुंडे यांना निवडणुकीत पराभव केला. प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्री सुद्धा केलेले नाही. त्यामुळे भाजपचे ओबीसी प्रेम बेगडी असल्याचे दिसून येते, असा हल्लाबोल राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला. मेळाव्याचे सूत्रसंचालन अजय तायडे व शशिकांत खेडकर यांनी केले. मेळाव्याला अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ओबीसी बांधव उपस्थित होते.