उधारीत दिले नाही.. मग चोरून नेले! हद्द तर पहा पुन्हा तेच बैल बाजारात विकायला आणले!!; खामगाव पोलिसांत शेगावच्या चोराविरुद्ध गुन्हा दाखल

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव येथील गुरांच्या बाजारात विकण्यासाठी आणलेले बैल उधारीत दिले नाही म्हणून चोरट्याने संधी साधून त्याच दिवशी बैलजोडी लंपास केली. त्यानंतर चोरलेली बैलजोडी वरवट बकाल येथील गुरांच्या बाजारात तो विकताना दिसून आला. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील शेतकऱ्याने काल, २८ मार्च रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बैल चोरणाऱ्या गौतम मधुकर तेलंग (रा. दादगाव, ता. शेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील शेतकरी  संतोष निळकंठराव वाटमारे (४३) यांनी १७ मार्च रोजी त्यांचे ४ बैल खामगाव येथील अकोला रोडवरील गुरांच्या बाजारात विकण्यासाठी आणले होते. दरम्यान, शेगाव तालुक्यातील दादगाव येथील गौतम मधुकर तेलंग हा वाटमारे यांना १ बैलजोडी  उधार मागत होता.

मात्र वाटमारे यांनी बैल घ्यायचे असतील तर नगदी पैसे लागतील, उधारीत मिळणार नाहीत, असे तेलंगला सांगितले. तरीही तेलंग अनेकदा त्यांच्या बैलजोडीजवळ चकरा मारत होता. दुपारी साडेचारला वाटमारे बैल दावणीला बांधून चहा पिण्यासाठी गेले. थोड्या वेळाने ते परतले असता त्यांना एक बैलजोडी दिसली नाही.

बाजारात शोध घेऊनही त्यांना त्यांची बैलजोडी मिळून न आल्याने दुसरी बैलजोडी घेऊन ते गावाकडे परतले. दरम्यान, त्यांनी जिथे जिथे गुरांचा बाजार भरतो त्या बाजारात जाऊन चोरीला गेलेली बैलजोडी शोधण्याचा प्रयत्न केला. १९ मार्च रोजी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे गुरांचा बाजार असल्याने बैलजोडीचा शोध घेण्यासाठी वाटमारे यांनी त्यांचा मित्र अब्दुल अजीज याला तिथे पाठविले असता त्या बाजारात तेलंगने वाटमारे यांची बैलजोडी विक्रीसाठी आणल्याचे दिसले. ६० हजार रुपयांची बैलजोडी तेलंगने चोरल्याचे वाटमारे यांनी काल,२८ मार्च रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून गौतम मधुकर तेलंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.