मंत्री नितीन राऊत कॅरेक्‍टरलेस!; त्यांना मुंबईत महिलेसोबत पकडले गेले होते... "वंचित'चा खामगावमध्ये हल्लाबोल!

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ऊर्जामंत्री नितीन राऊत कॅरेक्‍टरलेस असून, त्‍यांना मुंबईत महिलेसोबत पकडण्यात आले होते. त्‍यावेळी त्‍यांच्याच पत्‍नीने त्‍यांना चपलांचा प्रसाद दिला होता. जेव्हा जेव्हा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेससोबत युतीचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा याच लोकांनी युती होऊ नये म्‍हणून प्रयत्‍न केले. कारण त्‍यांना आपली दुकानदारी बंद होण्याची भीती आहे, असा खळबळजनक आरोप खामगावमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनोने यांनी केला.

मंत्री राऊत त्‍यांनी खामगावच्या दौऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांनी आत्‍मपरिक्षण केले पाहिजेत, असे वक्‍तव्‍य केले होते. त्‍यांचे हे वक्‍तव्‍य "वंचित'च्या जिव्हारी लागले असून, काल, २ मार्चला तातडीने निषेध सभा घेऊन राऊतांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. ॲड. बाळासाहेब आंबेडकरांविरुद्ध षड्‌यंत्रण रचणाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्धार केला. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून वंचित बहुजन आघाडीने निषेध सभा घेतली.

यावेळी भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा विशाखा सावंग, तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे, धम्‍मराज नितनवरे, संघपाल जाधव, माजी नगरसेवक विजय वानखडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री. सोनोने म्‍हणाले, की भाजपचे कोणते नेते ॲड. आंबेडकर यांना भेटले याचे पुरावे जाहीर करा अन्यथा मानसोपचार तज्‍ज्ञांकडे उपचार घ्या. अकोला येथील तज्‍ज्ञ डॉ. केळकर यांच्या रुग्णालयात तुमच्या नावाची नोंद केली असून, उपचार घ्या, असे ते म्हणाले. कधी हंडोरे, कधी आठवले तर आता राऊत यांच्यासोबत जाणाऱ्या दलबदलूंना गावबंदी करण्याची वेळ आल्याचेही सोनोने म्‍हणाले.