पोटच्या मुलीवर बलात्‍कार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सश्रम कारावास!; शेगाव तालुक्‍यात घडली होती घटना

 
46
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : स्वतःच्या १४ वर्षीय मुलीला शेतात नेऊन बलात्कार करणाऱ्या नराधम बापाच्या पापाचा घडा अखेर भरला. बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या नराधम बापाला खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. २०१८ मध्ये शेगाव तालुक्यातील एका गावात ही घटना घडली होती.

२२ नोव्हेंबर २०१८ रोजी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने (३५) दिलेल्या तक्रारीवरून मुलीच्या वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीचे आई- वडील मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील एका गावचे रहिवासी आहेत. दोघे पती- पत्नी शेगाव तालुक्यातील एका गावातील शेतमालकाकडे कामासाठी आले होते व शेतमालकाच्या शेतात राहत होते.

२१ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी मुलीचे वडील मुलीला घेऊन पाईप आणण्यासाठी दुसऱ्या शेतात गेले. तिथे मुलीच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला. रक्ताने माखलेले कपडे मुलीला धुवायला लावले आणि घडला प्रकार कुणाला सांगितल्यास विहिरीत लोटून देईल, अशी धमकी दिली. मात्र घाबरलेल्या मुलीने तिच्या आईला याबद्दल सांगितले. मुलीच्या आईने आधी खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. मात्र घटनास्थळ शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने मुलीच्या आईला शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला सांगण्यात आले.

त्यानंतर रात्री उशिरा शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मुलीच्या वडिलांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेगाव ग्रामीण पोलिसांनी जलदगतीने तपास करून आरोपीला अटक केली व दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲड. राजेश्वरी अजय आळशी यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

याप्रकरणात तपास अधिकारी असलेले शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे तत्कालिन ठाणेदार, पीडित मुलगी, पीडितेची आई आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश प्रज्ञा काळे यांनी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व ५ वर्षे दंडाची शिक्षा सुनावली.