खामगावच्या लेकीचा जळगावात छळ; पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

 
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगावच्या लेकीचा जळगावात पती व सासरच्यांनी अतोनात छळ केला. तिचा जबरदस्ती गर्भपात  केला. तिच्या अंगावरील दागिने काढून तिला घराबाहेर हाकलून लावले. अखेर तिने आज,३० मार्च रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.   तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 खामगाव शहरातील शिवाजीनगरात माहेरी राहणाऱ्या शिवाणी राहुल चव्हाण हिने याप्रकरणाची तक्रार दिली आहे. तिचे लग्न जळगाव खान्देश येथील राहुल संजय चव्हाण याच्याशी झाले होते.

तिच्या तक्रारीनुसार लग्नानंतर तिला केवळ दोन ते तीन महिने चांगले  वागविले . त्यानंतर सासरचे तिचा छळ करू लागले. पतीला दारूचे व्यसन होते तो रात्री बेरात्री घरी यायचा. पत्नीने विचारणा केल्यावर  तिला मारहाण करायचा. तिला तिच्या नावाने जबरदस्ती कर्ज घ्यायला लावले. तिने नकार दिल्यावर मारहाण केली.

 तिला माहेरवरून पैसे आणायला लावले. तिच्या वडिलांनी पैसे देऊनही छळ थांबला नाही. पती व सासरा तिला मूल होऊ नये म्हणून तिला जेवणातून गोळ्या द्यायचे तर सासू मुल हवे म्हणून तगादा लावायची. जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिचा गर्भपात झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. सासरचे खुनशी स्वभावाचे आहे, त्यांच्यापासून तिच्या जीवाला धोका असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

 तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी पती राहुल संजय चव्हाण, सासरा संजय बळीराम चव्हाण, सासू सुनीता संजय चव्हाण, दिर ऋतिक संजय चव्हाण सर्व रा .श्रीराम नगर,   भुसावळ , जि जळगाव व नणंद प्रतिमा मिथुन धालवड  रा. तांदळीदुमाला , जि  अहमदनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.