सौ. वर्षा अहिरेंचा प्रामाणिकपणा... सौ. मोहिनी भिडेंना मिळाला हरवलेला मोबाइल..!; मोताळ्यातील घटना
Feb 9, 2022, 10:55 IST
माेताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कामानिमित्त बँकेत जात असताना सांगळद (ता. मोताळा) येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अहिरे यांच्या पत्नी सौ. वर्षा अहिरे यांना रस्त्याच्या बाजूला मोबाइल पडलेला दिसला. त्यांनी मोबाइलचा फोटो मोताळा येथील नगरसेवक विजय सुरळकर यांच्या मोताळा टाइम्स ग्रुपवर टाकून मोबाइल सापडल्याची माहिती दिली. ही माहिती ज्यांचा मोबाइल हरवला होता, त्यांच्यापर्यंत गेली आणि त्यांनी सौ. अहिरे यांच्याशी संपर्क साधला. ओळख पटवून मोबाइल मोताळा येथील संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य दिनेश भिडे यांच्या पत्नी मोहिनी भिडे यांना परत करण्यात आला. त्यांचे दीर सुरेश भिडे यांनी मोबाइल स्वीकारला. सौ. वर्षा अहिरे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.
सौ. मोहिनी भिडे या ५ फेब्रुवारी रोजी कामानिमित्त सांगळद येथे जात असताना हातातील मोबाइल पर्समध्ये ठेवताना तो पर्सऐवजी रस्त्यातच पडला. १५ हजार रुपये किंमतीचा हा मोबाइल आहे. त्यांनी मोबाइलचा सगळीकडे शोध घेतला. मात्र मिळून आला नव्हता. ७ फेब्रुवारीला अखेर त्यांना सौ. वर्षा अहिरे यांच्यामुळे मोबाइल मिळाला. मैत्रिणींसोबत बँकेत जात असताना त्यांना मोबाइल सापडल्याने मूळमालकापर्यंत मोबाइल येऊ शकला नसता. दुसऱ्या कुणाला मोबाइल सापडला असता तर कदाचित सौ. भिडे यांना मोबाइल कायमचा गमवावा लागला असता.