खाकीतील माणुसकी!;खामगावच्या वाहतूक पोलिसांनी हातात फावडे, टोपले घेऊन बुजवले खड्डे!! नागरिक म्हणतात सलाम साहेब...!

 
खामगाव ( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  खाकीतील पोलीस बांधव कधी या ना त्या रूपाने जनतेला नेहमीच मदत करत असतात. कधी कोरोना काळात देवदूत बनून,तर कधी गुन्हेगारांचा कर्दनकाळ बनून..! मात्र आज खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वाहतूक पोलिसांनी चक्क रस्त्यावरील खड्डे बुजवून त्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाला काही प्रमाणात का होईना फुल स्टॉप मारल्याचे चित्र खामगाव नांदुरा रोडवर दिसले. 

 ऐन पावसाळ्यात अनेक शहरात रस्त्यांना खड्डे पडून अनेकांना अपघाताला कसे सामोरे जावे लागते, याच्या बातम्या आपण पाहतो  वाचतो, अशाच प्रकारे खामगाव - नांदुरा रोडवरील एमआयडीसी टर्निंग वर सुद्धा रोडला खड्डे पडले होते. त्यामुळे त्या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता.

त्यामुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेऊन हातात फावडे व घमेले घेतले व खामगाव - नांदुरा रोडवरील एमआयडीसी टर्निंग वरील खड्डे १७ जुलै रोजी स्वतः बुजवले. खाकितील या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत खड्ड्यांमुळे इथे नेहमी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन या रस्त्यावरील खड्डे बुजवावे व वाहनधारकांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी अनेकांकडून होत आहे.

 'खड्ड्यांमुळे वाहनांचे पाटे तुटत होते,रोज  अपघात होत होते,खड्डे मोठे असल्याने  ट्रक पलटी होण्याचा धोका होता. या रोडवर एमआयडीसी असल्याने अनेक  कंपन्या आहेत. त्यात असलेले कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर ये-जा करत असतात त्यांच्या सुद्धा वाहनाचे अपघात घडत होते. त्यामुळे तीन ठिकाणचे सुमारे १० हून अधिक खड्डे बुजविले त्यामुळे अपघातची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.या उपक्रमात शिवाजी नगर पोलीस स्टेशन चे वाहतूक पोलिस कर्मचारी पोहेका किरण राऊत,नापोका संतोष इटमल्लू,पोका संदीप गुळवे,पोका बंटी बडगे,पोका रफिक शहा,पोका सतीश जाधव यांनी हे खड्डे बुजविले,'अशी माहिती वाहतूक शाखेचे पोहेका किरण राऊत यांनी दिली आहे.