हृदयद्रावक..! शेतकऱ्याच्या कष्टाला लागली नजर; बहरलेल्या केळीच्या बागेला लागली आग! दीड एकर केळी जळून खाक; संग्रामपूर तालुक्यातील घटना

 
456
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेतकऱ्याने राब राब राबून फुलवलेल्या  केळीच्या बागेला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक... अख्खी दीड एकरावर लावलेली संपूर्ण केळीची बाग आग लागल्याने   जळून खाक झाली. संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा येथे काल, २६ एप्रिलच्या सायंकाळी ही घटना घडली. आज, २७ एप्रिलला केलेल्या पंचनाम्यानुसार या आगीत शेतकऱ्याचे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

456

 काकनवाडा येथील शेतकरी विष्णुदेव तुळशीराम आढाव यांनी त्यांच्या दीड एकर शेतात गेल्यावर्षी केळीची बाग लावली होती. दीड एकरात त्यांनी २७०० खोडे लावली होती. सध्या केळी काढणीला आली होती. काल, २६ एप्रिलच्या सायंकाळी त्यांच्या या बागेला अचानक आग लागली. आगीचे तांडव एवढे होते की ती विझवता येणे कठीण होते. परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

मात्र तोपर्यंत संपूर्ण बाग जळाली होती. या आगीत केळीची २७०० झाडे होरपळल्याने पूर्णपणे नुकसान झाले. याशिवाय शेतातील ठिबक संच व पाईपसुद्धा जळून खाक झाले. आज तलाठी, सरपंच व पंचानी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या आगीमुळे शेतकऱ्याचे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्याला शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.