गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन घरे भस्मसात; चार लाखांचे नुकसान, मोताळा तालुक्‍यातील भीषण घटना

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दाेन घरे भस्मसात झाली. दोन्ही घरांतील जीवनावश्यक वस्तूंसह रोख रक्कमही जळून गेली. यात ३ लाख ९२ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मोताळा तालुक्यातील वरूड येथे आज, २२ मार्चला सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

वरूड येथील राम दशरथ पाटोळे यांच्या सुनेने सकाळी साडेसातच्या सुमारास चहा व स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडर चालू केले होते. त्‍याचवेळी सिलिंडर लिक होऊन अचानक मोठा भडका उडाला. आगीने क्षणार्धात मोठा पेट घातला. राम पाटोळे यांच्या घरासह दशरथ भोनाजी पाटील यांच्या घराला यामुळे आग लागली. पाटोळे यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम जळून गेली. त्यांचे २ लाख १६ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

शेजारीच राहणाऱ्या दशरथ पाटील यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे व अन्य सामानाची राख झाली. त्यांचे १ लाख ७६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झाली नाही. गावातील लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत दोन्‍ही घरांची पार राखरांगोळी झाली. घटनेची माहिती मिळताच तलाठी एन. एस. देवकर यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मोताळा तहसील प्रशासनाला तसा अहवाल सादर केला आहे. या वेळी पोलीस पाटील, सरपंच व गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. पाटोळे व पाटील कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यांना प्रशासनाकडून तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे.