आठ दरोडेखोरांची टोळी शेगावमध्ये जेरबंद!; सतर्क LCB मुळे टळली मोठी लुटमार!!, तलवार, चाकू, लाकडी दांडे, मिरची पूड... तयारीनिशी करणार होते कांड

 
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दरोडा टाकण्याच्या तयारीतील आठ जणांच्या सशस्त्र टोळीला बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. मिरची पावडर, तलवार, चाकू, लाकडी दांडे व कार असा एकूण सात लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेगाव- वरवट बकाल रोडवर काल, ३१ मार्चच्या रात्री ११ वाजता ही कारवाई करण्यात आली.

दरोडेखोरांची टोळी लुटमार करण्याच्या उद्देशाने दबा धरून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने रात्री ११ च्या सुमारास शेगाव- वरवट बकाल रोडवरील भारत गॅस गोडावून गाठले.

गोडावूनच्या बाजूला  एक कार लाईट बंद करून उभी दिसली. वाहनाच्या शेजारी युनिकॉर्न दुचाकीवर दोन जण बसलेले होते. पथकाला संशय आल्याने त्यांनी गाडीतील लोकांची चौकशी केली. तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. वाहनातील सर्व जण जळगाव जिल्ह्यातील असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र शेगावात येण्याचे कारण त्यांना विचारले असता प्रत्येकाने वेगवेगळे उत्तर दिल्याने पोलिसांचा संशय बळावला.

एलसीबी पथकाने वाहनाची झडती घेतली असता  वाहनात एका पिशवीत मिरची पावडर, सोनेरी रंगाचे ५० धातूचे शिक्के, लाकडी दांडे,  १ तलवार, १ चाकू असे साहित्य आढळले. पथकाने कसून चौकशी केल्यानंतर शेगाव शहरात लुटमार करण्यासाठी आल्याची कबुली एकाने दिली. त्यानंतर एलसीबी पथकाने सर्व दरोडेखोरांना त्यांच्याकडील कार व साहित्यासह ताब्यात घेतले. शेगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विशाल गोपाल इंगळे (२३, रा. पारंबी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव),  नीलेश मधुकर धामोळे (३४), भूषण प्रभाकर चांडक (२१), प्रथमेश सुरेश चोपडे (२१, तिघे रा. कुऱ्हा, ता. मुक्ताईनगर), परमेश्वर रघुनाथ भोलांकर (रा. काकोडा, ता. मुक्ताईनगर), आरिफ फरीद तडवी (२४, रा. जोंधनखेड, ता. मुक्ताईनगर), मुफिस अब्दुल रफिक (३४, रा. सरायपुरा, ता. जळगाव जामोद) आणि अवधेश रामेश्वर पवार (२३, रा. वाडी ता. जळगाव जामोद) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून कार, युनिकॉर्न मोटारसायकल, १२ मोबाइल, १ तलवार ,१ चाकू, मिरची पावडर , ५० सोनेरी धातूचे शिक्के असा एकूण ७ लाख १० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक अमित वानखेडे, सहायक पोलीस निरिक्षक मनिष गावंडे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, नापोकॉं गणेश पाटील, पोकॉं गजानन गोरले, राहुल बोर्डे यांनी पार पाडली.