युवकांची गांधीगिरी!; जळगाव जामोद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी पूजले खड्डे!!
Mar 24, 2022, 11:27 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामाेद तालुक्यातील मडाखेड खुर्द ते इलोरा रस्ता खड्ड्यांचे माहेरघर बनला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वेळावेळी मागणी करूनही रस्त्याची अवस्था काही बदलली नाही. अशीच अवस्था तालुक्यातील कुरणगाड बुद्रूक, टाकळी खासा, सातळी, गोळेगावला (नवीन) जाणाऱ्या रस्त्याची सुद्धा झाली आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी युवकांनी काल, २३ मार्चला गोळेगाव फाटा आणि कुरणगाड फाट्यावरील खड्ड्यांचे पूजन करून अनोखे आंदोलन केले.
पावसाळ्यात तालुक्यातील रस्त्यांवरून चालणेही अवघड होते. रस्ते चिखलाने माखलेले असतात. या प्रश्नी अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भरपावसात ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते. मात्र रस्त्याची समस्या गांभीर्याने घेण्यात आली नाही.
तालुक्यातील सर्व रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावून ग्रामस्थांचे हाल थांबवावेत, या मागणीसाठी अक्षय पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराने खड्डे पूजन आंदोलन केले. प्रशासकीय यंत्रणा व शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. आंदोलनात वैभव जाणे, आकाश आटोळे, पंजाबराव पाटील, पप्पू पाटील, शुभम रोटे, गणेश परिहार, गजानन पाटील, बाळू घुळे, सदाशिव जाणे, विश्वंभर पाटील, सुरेश पुरी, सोपान भालतडक, दत्ता पाटील अादींचा सहभाग होता.