वाघोबा काय करतो पासून तर अस्वलाच्या करामती अन् माकडचाळ्यांपर्यंत सर्वच होणार कॅमेऱ्यात कैद!; अंबाबरवा अभयारण्यात लावले १४८ कॅमेरे
Feb 13, 2022, 10:52 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाघोबा काय करतो, कुणावर लक्ष ठेवतो इथपासून तर अस्वलाच्या करामती अन् माकडाचे चाळे... सारेच काही कॅमेऱ्यांत कैद होणार आहे... ऐन व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या "प्रायव्हसी'चे सरळ सरळ उल्लंघन तब्बल १४८ कॅमेरे संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्यात करणार आहेत. पुढील ३० दिवसांत या कॅमेऱ्यांत जे टिपलं जाईल ते डेहराडूनच्या वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूटमध्ये पाठविण्यात येणार आहे. या डेटाचा उपयोगी वन्यजीवांच्या संरक्षणाच्या उपाययोजना करण्यासाठी होणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
सोनाळा वनपरिक्षेत्र १५ हजार ८३९ हेक्टरमध्ये विस्तारलेले असून, संरक्षित क्षेत्र असल्याने दाट झाडी आहेत. अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, रानम्हशी, तडस, माकड, कोल्हा, खवले मांजर, रानहेल्यांसह पशू-पक्षी व दुर्मिळ वनस्पतींचा वारसा या अभयारण्याला लाभला आहे. साग, सालई, अर्जुन, बेल, मेळसिंगा, आवळा, अंजन, तेंदू, बांबू, पिंपळ, उंबर, धावडा, पळस यासह असंख्य वृक्ष आहेत. निसर्गाचे हे अद्भूत वनवैभव आहे, असे म्हटले तरी अतिशोक्ती ठरणार आहे. कॅमेरे लावून डेटा गोळा केला जाणार असून, याचे संचलन मेळघाट व्याघ्र संचालक व वन्यजीव विभाग अकोट येथे होत आहे. स्वयंचलित कॅमेऱ्यात चीप असून, ते झाडाच्या बुंध्याजवळ बसविण्यात आले आहेत.