आयशरची दुचाकीला धडक; युवक जागीच ठार, १ गंभीर जखमी; मलकापूर शहरातील घटना

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. मलकापूर शहरातील बुलडाणा रोडवरील भगवती ज्वेलर्ससमोर काल, १६ फेब्रुवारीला रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
गोपाल रमेश सोनोने (३२, रा. रोहिदासनगर, मलकापूर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. गोपाल सोनोने व त्याचा मित्र गोविंदा चरचरे (३०, रा. रोहिदासनगर, मलकापूर) दोघे दुचाकीने मलकापूर बसस्थानकावरून हनुमान चौकाकडे जात होते. भगवती ज्वेलर्ससमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशरने (क्र. एम. एच. २८ बी ८५२८) दुचाकीला जबर धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरून दोघे जोरात पडले. डोक्याला जबर मार लागल्याने गोपाल जागीच ठार झाला. जखमी गोविंदाला मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातात कारणीभूत ठरलेल्या आयशर वाहनाला पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे.